अधिकारी होण्याच्या जिद्दने पेटून उमेश सकाळी ६ वाजताचा त्याच्या रूम मधून अभ्यास करण्यासाठी निघाला होता. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. गावात असणाऱ्या त्याच्या आईवडिलांची त्याला आठवण येत होती. पहाटेच उठून गोठ्यातील शेण काढताना जनावरांच्या हंबरण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला की त्याला आनंद वाटायचा. मात्र पुण्यात आल्यापासून कुत्र्याचा भूंकण्याचा आवाज एकाला तरी त्याला आनंदून जायचे. धारा काढत असतानाच कोरं(कच्चे) दूध पिण्याची त्याची सवय. पुण्यात आल्यापासून या गोष्टी कधी मागे पडल्या होत्या हे त्याला ही समजले नव्हते.
डोक्यातले विचार शांत होत नव्हते. आता चहा घेऊनच अभ्यासिकेत जावे. असे मनात ठरवून त्याची पावले चहाच्या टपरीकडे वळाली. पातेल्यातील चहा उकळताना त्यातून येणाऱ्या सुंदर वाफा बघता बघता उमेशच्या डोक्यातले वादळ हलके होऊन शांत होण्याच्या मार्गावर होते. चहाचा घोट घश्याच्या खाली उतरला की डोके शांत ठेवून अभ्यासिकेत जाऊन अर्थशास्त्राचे पुस्तक दिवसभरात वाचून काढायचे या विचाराने त्याने ग्लास उचला. तेवढ्यात त्याची नजर समोरील झाडाकडे गेली. उगवत्या सूर्याची किरणे झाडावर पडल्याने फांद्याही त्याच किरणांच्या रंगात मिसळून गेल्या होत्या. मध्येच येत असलेल्या हवेच्या झुळुकेमुळे फांद्यांचा किरणांसोबत खेळत चालला होता. पुन्हा हवेची झुळूक येताच झाडाखालून येणाऱ्या सुंदर मुलीच्या केसांची बट देखील तितकीच सुंदर उडत होती. चेहऱ्यावर निखळ हास्य, टवटवीत दिसणारा चेहरा आणि फांद्यांचा सुरु असलेल्या खेळ हे दृश्य पाहून कोण मोहात पडणार नाही.? चहाच्या एका एका घोटासोबत उमेश जास्तच त्या मुलीकडे आकर्षिला जात होता. ती जस जशी पुढे येत होती, तसे तिला जवळून पाहण्याची त्याची बैचैनी वाढत होती. ग्लासातला चहा संपलेला असून देखील तो पुन्हा पुन्हा ग्लास तोंडाला लावत होता. तिच्या सुंदर रूपावर उमेश बहाळला होता. क्षणभर त्याला काही सुचत नव्हते. एकटक नजरे तिच्याकडेच पाहत होता. योगायोगाने तीही चहा घेण्यासाठीच टपरीवर आली. पाठीवर अडकवलेली बॅग, हातात असलेले वर्तमानपत्र बघून उमेशची खात्री झाली की, ती देखील स्पर्धा परीक्षेचाच अभ्यास करत असावी.
उम्या झाला का चहा ? राजूने आवाज देताच उमेश भानावर आला. हो, हो असे म्हणत उमेश अभ्यासिकेकडे निघाला.
उमेशची राजू सोबत अभ्यासिकेत प्रवेश घेताना ओळख झाली होती. दोघेही नवीन असल्याने त्यांची दुसऱ्या कोणाशी फारशी ओळख नव्हती. त्यामुळे त्यांची ओळख वाढत गेली. एकमेकांच्या शेजारीच अभ्यासास बसत. अभ्यासात दोघेही हुशार होते. राजूने दोनदा राज्य सेवेची मुख्य परीक्षा दिली होती. तो दुसऱ्या वेळेस दिलेल्या मुख्यपरीक्षेच्या निकालाची वाट बघत होता. तर उमेशने संयुक्त परीक्षेची एकदा मुख्य परीक्षा दिली होती. पोलिस उपनिरीक्षक होण्याचे त्याचे स्वप्न होते. उमेशचा राजू मित्र असला तरी त्याच्या मोठया भावाप्रमाणेच होता.
उमेश नेहमी प्रमाणे त्याच्या ठरलेल्या बेंचवर जाऊन बसला. अर्थशास्त्राचे पुस्तक त्याने बागेतून बाहेर काढले. दिवसभरात पुस्तक वाचून काढायचे होते ते त्याच्या लक्ष्यात येताच त्याने पूर्ण एकाग्रग होऊन पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. मात्र पुस्तकात त्याचे मन रमत नव्हते. त्याच्या डोळ्यांसमोर सकाळचेच दृश्य येत होते. त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. एकच आठवत होते, हवेची झुळूक, उडणारी केसांची बट आणि तिचा सुंदर चेहरा.
दिवसभरातल्या या विचारांनी उमेश नर्वस झाला होता. दिवसभरात तो नीट जेवलाही नव्हता. रात्रीच्या जेवणावर त्याचे लक्ष नव्हते. अभ्यासिकेतून रूमला जाण्याची वेळ झाली होती. तरीही त्याच्याकडून केवळ चार पाने वाचून झाली होती. निघताना मोबाईलमध्ये वाचले, ”दिवसभरातल्या घडामोडींमुळे शेयर बाजाराचा सेंसेक्स कोसळला. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली”.
रात्री झोपताना, मोबाईलमध्ये जुनी गाणी ऐकत दिवसभरात काय काय अभ्यास केला. एमपीएससी कसे प्रश्न विचारू शकते, आणखी अभ्यासात कशी सुधारणा करत येईल. याचे गणित मांडण्याची त्याची सवय होती. मात्र आज वेगळेच गणित जमवण्याचा प्लॅन त्याच्या डोक्यात सुरु होता. सकाळी उठून पुन्हा त्याच वेळेला त्याच ठिकाणी चहा घेयचा. आणि तेच मोहक दृश्य पुन्हा पाहण्याची त्याला उत्सुकता लागली होती. नेहमीप्रमाणे उमेश सकाळी लवकर उठला. अपुऱ्या झोपमुळे त्याचे डोळे जड झाले होते.
रूम मधून बाहेर पडताना त्याने दहा वेळा तरी हातातील घड्याळाकडे पाहिले होते. उशीर तर झाला नाही ना याची त्याला धास्ती वाटत होती. मोठया गडबडीने तो टपरीवर पोहचला. चहाचे पातेले देखील शेगडीवर ठेवले गेले नव्हते. सूर्य उगवायला अवकाश होता. त्यामुळे ते झाड देखील उदास असल्यासारखे त्याला भासत होते. कधी चहा होईल आणि कधी सूर्य किरणे झाडावर पडतील, फांद्यांचा आणि किरणांचा खेळ कधी सुरु होईल. तसेच तिचा टवटवीत चेहरा कधी नजरेस पडेल. याची त्याला हुरहूर लागली होती. फुल देऊ कि कटिंग ?, चहावाल्याने आवाज दिला. ती कधी येईल या विचाराने त्याला चहा देखील गोड लागत नव्हता. घड्याळाचे काटे फिरत होते, तीन वेळा चहा देखील घेऊन झाला होता. किरणे ना त्या झाडावर पडली होती, ना हवेची झुळूक येत होती. फांद्या देखील गबगार होत्या. ढगाळ वातावरणामुळे उदासीनता वाटत होती. तीच उदासीनता उमेशच्या मनावर अधिक परिमाण करत होती. शेवटी तो अभ्यासिकेत गेला.
अर्थशात्राच्या पुस्तकात बेरोजगारी, आर्थिक उत्पन्न , मानव निर्देशांक, जीडीपी, मागणी वाढली की पुरवठा कमी होतो. त्यामुळे महागाई वाढते. पुरवठा वाढला की मागणी कमी होती. त्यामुळे वस्तूंच्या किमती कमी होतात. याचा परिणाम आर्थिक घडामोडींवर होतो. त्यामुळे दोन्ही स्थिर राहिले की आर्थिक स्थिरता येते. हे सगळे त्याच्या डोक्यावरून चालेले होते. सकाळी अपेक्षा भंग झाल्याने उमेश खुपच नाराज होता. आजचा दिवस तसाच गेला. पुन्हा तेच नियोजन, तीच निराशा , घेऊन उमेश एक एक दिवस वाया घालवत होता. या दिवसांमध्ये तो ना राजुला भेटला होता ना रूममेटशी काही बोलत होता. अचानक त्याच्या अशा वागण्यात पडलेला फरक राजुच्या लक्षात आला होता. मात्र काही तरी झाले असेल असे समजून त्याने दुर्लक्ष केले. राजू मुलाखतीच्या तयारीत व्यस्त होता.
नित्यनियमाने उमेश टपरीवर जात होता, चहा घेऊन अभ्यासिकेत बसता होता. मागील काही दिवसांपासून उमेश केवळ अभ्यासिकेतच बसत होता, खरे पण त्याचे लक्ष अभ्यासात नव्हते. ही गोष्ट त्याच्या लक्षात येत होती. मात्र काहीकेल्या त्याला त्यातून बाहेर पडता येत नव्हते. एका रात्री व्हॉट्सॲपवर एक लिंक येऊन पडली. अत्यंत खडतर मार्गातून अवघ्या २१ व्या वर्षी युपीएसीसीमध्ये यश संपादन करू कलेक्टर होण्याचे स्वप्नं केले साकार. ही बातमी वाचताच उमेश भानावर आला. आपण काय करतोय याची त्याला जाणीव झाली. आठवडा भरात फुकट घालवलेल्या दिवसांचे गणित मांडून, सकाळी लवकर उठण्याच्या तयारीने तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र केवळ एका मोहापायी सात दिवस वाया घालवले ते त्याच्या पचनी पडले नव्हते. कसाबसा तो झोपी गेला.
नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठवून फ्रेश मुड मध्ये अभ्यासिकेकडे निघाला, वाटेत येणाऱ्या चहाच्या टपरीकडे बघत हात जोडून नको रे तुझा चहा, असे पुट्पुटत न थांबता थेट त्याच्या बेंचवर जाऊन बसला. गेल्या आठवडाभरात डोक्यावरून जाणारे अर्थशास्त्र त्याला आज समजू लागले होते. झालेल्या नुकसानीमुळे कशी अर्थव्यवस्था ढासळू शकते, हे त्याला पक्के समजून येत होते. दिवभरात छान अभ्यास झाल्याचे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. रूमला निघण्यापूर्वी, गेल्या काही दिवसातल्या शेअर बाजारातील निर्देशांक अचानक उसळी घेतल्याने गुंतवणूकदार सुखावले. ही बातमी वाचून उमेश चेहऱ्यावर हास्य फुलले.
उमेश आता छान अभ्यास करू लागला होता. राजू आणि त्याची भेट होऊन पुन्हा अभ्यासाच्या गप्पा सुरु झाल्या होत्या. एमपीएससीच्या वेळापत्रकानुसार संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) चांगल्या जागा आल्याने उमेशचा उत्साह वाढला होता. परीक्षेच्या तारखेपर्यंतचे नियोजन आखले गेले. पुस्तकाची यादी तयार झाली. अभ्यासाचे नित्यनियोजन ठरले. ठरल्याप्रमाणाने उमेश वेळापत्रकाचे पालन करत होता. आता त्याच्या समोर एकच ध्येय होते, पीएसआय होण्याचे.
अभ्यासाचा ताण वाटू लागल्याने सहज उमेश चहाच्या टपरीवर गेला. त्याची नजर त्या झाडावर पडली. हिरव्यागार असलेल्या फांद्या वाळू लागल्या असल्याचे त्याला दिसले. याबाबदल सहज चहावाल्याला विचारले असता, ”अरे उन्हाळा सुरु झालाय , त्यामुळे आता नव्याने झाडांना पालवी फूटत असते. बघ अजून काही दिवसांनी झाड फुलेल”. असे उत्तर मिळाले. उमेशला त्या मोहक दृश्याची आठवण झाली. ‘फुटेल पालवी एकदा ही’, अशी त्याने स्वतःच्या मनाची समजूत घालती.
मुख्यपरीक्षेचा निकाल लागल्याने राजू आता अभ्यासिकेत येण्याऐवजी मुलाखतीच्या मार्गदर्शनासाठी जात होता. त्यामुळे अभ्यासिकेत राजूची जागा मोकळी होती. उमेश गांभीर्याने अभ्यास करीत होता. त्यात एकेदिवशी राजूच्या जागेवर कोणी तरी बसले असल्याचे त्याला दिसले. योगायोगाने त्या मोहक दृश्याची आठवणीतली तीच त्या जागेवर बसली होती.
आनंदी होण्याऐवजी उमेश तणावात आला होता. ज्या मोहापासून स्वतःचा बचाव करीत होता. तोच मोह समोर होता. आता त्या पासून स्वतःला कसे वाचवायचे? या विचाराने उमेश विचलित झाला. काही झाले तरी लक्ष ढळू देयचे नाही. मनावरचा ताबा सोडायचा नाही, असे ठरवून पुन्हा अभ्यासला लागला. त्यादिवशी तो मनावर ताबा ठेवण्यात यशस्वी ठरला होता.आता तिने देखील तीच जागा बसण्यासाठी निवडली होती. उमेश तिच्याकडे बघण्याचे कटाक्षाने टाळत होता. मात्र त्याच्या मनात तिच्याशी ओळख करण्याची, बोलण्याची इच्छा घोळ घालत होतीच. कितीही नाही म्हटले तरी त्याची नजर तिला न्याहाळत होतीच.
उमेशने वर्तपमानपत्र वाचून बेंचवर ठेवले होते. नेमके त्याच दिवशी ती विसरली होती. उमेशला विनंती करून तिने ते वर्तमानपत्र घेतले. तिथूनच त्यांची पहिली ओळख झाली. नाही नाही म्हणता वर्तमानपत्रावरची गोष्ट चहावर येऊन पोहचली होती. उमेश तिच्यात अडकू लागला. परीक्षा जवळ येत होती. तसे उमेश तिचा अधिक विचार करू लागला होता. तिचा डबा आणणे, तिला तिच्या रुपावरुन घेयला-सोडवायला जाणे, गप्पा मारण्यात वेळ घालवणे. असा त्याच नित्यक्रम सुरु झाला होता. तिच्या सुखदुःखाची त्याला चिंता वाटू लागली होती. तिला खुश ठेवण्यासाठी वाटले ते करू लागला होता. तीही त्याच्या सोबत रमून गेली होती. दोघांनाही ते आवडत होते, उमेशचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते. तिचे ही प्रेम असावे अशी खात्री उमेशला तिच्या वागण्याबोलण्यावरून आली होती. यात मात्र परीक्षा तोंडावर आली असल्याचा त्याला विसर पडू लागला होता.
उत्सुकतेपोटी मुलाखतीनंतर राजू उमेशला भेटण्यासाठी अभ्यासिकेत आला. मात्र उमेश दिवसभर अभ्यासिकेत फिरकलाही नसल्याने त्या दोघांची भेट होऊ शकली नाही. मुलाखत चांगली झाली असून लवकरच निकाल लागेल आणि अधिकरी नक्की होईल. हे उमेशला सांगायचे होते. राजू कधी येऊन गेला याची खबरही उमेशला नव्हती. त्याच्या फोनला ही उमेश ने उत्तर दिली नव्हते.
उमेशचे आणि तिचे छान चालेल होते. लग्नाचे स्वप्न देखील तो रंगवू लागला होता.
दरम्यान राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होऊन राजूला उपजिल्हाधिकरी पद मिळाले.
याचा आनंद होऊन, माझा मित्र उपजिल्हाधिकरी झाला. असे उमेशने तिला सांगितले. मित्र नव्हे माझा भाऊ अधिकारी झाला. असे तो मोठ्या आनंदाने सांगत होता. त्या आनंदाच्या भरात ‘मी लवकरच पीएसआय होईल. मग आपण मोठ्या थाटात लग्न करू’ असे नकळत तिला प्रपोज केले. ती क्षणभर स्तब्ध झाली. ‘असा कसा विचार करू शकतोस. मी तर एक चांगला मित्र मानते, नव्हते तर एक मार्गदर्शक म्हणून पाहाते. , बोलून ती रागाने निघून गेली.” असे ऐकताच उमेश पुरता ढासळला. एकीककडे मित्र अधीकारी झाल्याचा आनंद तर दुसरीकडे झालेल्या प्रेमभंगाचे दुःख.
अन् अश्रूंचा बांध फुटला
अश्रूंचा फुटणारा बांध अवरत तो , नवीन निवड झालेल्या अधिकाऱ्यांच्या जल्लोषाकडे निघाला. हातात गुलाल घेवून तो राजूला शोधत होता. ढोल ताशांच्या तालात मुले थिरकत होती. तर गुलालाची उधळण सूरू होती. राजू दिसताच हातातील गुलाल त्याच्या चेहऱ्यावर लावून घट्ट मिठी मारून उमेशने त्याच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राजूला देखील गहिवरून आले होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्याने उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले होते. या सर्वाचा साक्षीदार उमेश होता.
अभ्यासिकेतील निवड झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना पुढे घेऊन त्यांच्या डोक्यावर फेटा बांधला जात होता, तर गळ्यात पुष्पहार घातला जात होता. हे देखणे दृश्य बघून याच क्षणासाठी आपण खेड्यातून पुण्यात अभ्यासासाठी आलो आहोत. कोणत्याही मोहाळा बळी न पडता प्रेम नव्हे तर पदच मिळविणे हेच ध्येय आहे. ‘स्पर्धा परीक्षेच्या उमेदवाराला प्रेम करण्याचा अधिकार नाही’ हे वाक्य उमेशला आता चांगलेच उमगले.