Site icon द पब्लिक न्यूज

दहावी-बारावीच्या परीक्षा देताना ‘या’ शाळेतील विद्यार्थ्यांना येऊ शकतात अडचणी

Education news

इयत्ता दहावी व बारावीच्या मार्च 2025 आणि जुलै ऑगस्ट 2025 परीक्षा संबंधित उत्तरपत्रिका तपासणी आणि इतर परीक्षाशी संबंधित कामकाजासाठी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या हजेरी पटावरील प्रत्येक विषय शिक्षकांची नावे ऑनलाइन प्रोफाइलमध्ये भरली जावीत, याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य आणि संस्थेच्या सचिवांची आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर परीक्षा अर्ज भरताना शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्रोफाईलमध्ये शाळेची माहिती, मान्यता प्राप्त विषय आणि इयत्ता दहावी व बारावीच्या वर्गासाठी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांची माहिती भरली जावीत, असे बंधनकारक केले आहे. या सर्व माहितीचे अद्ययावत काम ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पूर्ण न केल्यास, संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची प्रिलिस्ट, विद्यार्थी यादी व फी चलन मंडळाकडून स्वीकारली जाणार नाही, असे राज्य मंडळाचे सचिव औदुंबर उकिरडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. यामुळे, शाळांची माहिती अद्ययावत न झाल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी अडचणी निर्माण होऊ शकतात.

राज्य मंडळातर्फे शाळांची व कनिष्ठ महाविद्यालयांची प्रोफाइल अद्ययावत केली जात आहे. याबाबत शिक्षण मंडळाने शाळांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. आता शाळा आणि शिक्षकांचे प्रोफाइल ३० नोव्हेंबरपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे. ज्या शाळा दिलेल्या मुदतीत माहिती अद्ययावत करणार नाहीत, त्यांची परीक्षा प्रिलिस्ट, विद्यार्थी यादी आणि फी चलन मंडळाकडून स्वीकारली जाणार नाही, याची गंभीर नोंद घ्यावी.

त्याचप्रमाणे, शिक्षक पॅनल अद्ययावत करण्यासाठी मंडळाकडून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षक पॅनलची प्रत पाठवण्यात आली होती. ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी पॅनल अद्ययावत करून मंडळाकडे सादर केलेले नाहीत, त्यांना संबंधित पॅनल व प्रिलिस्ट साहित्य मंडळ प्रतिनिधीकडे सादर करावे लागेल.

इयत्ता दहावी व बारावीच्या मार्च २०२५ आणि जुलै ऑगस्ट २०२५ परीक्षांशी संबंधित उत्तरपत्रिका तपासणी व इतर परीक्षेच्या कामांसाठी शाळांतील शिक्षकांची नावे प्रोफाइलमध्ये भरली जावीत. तात्पुरत्या स्वरूपात नेमलेले शिक्षक असले तरी, त्यांची नावे पॅनलमध्ये वेळेवर दिली जावीत, याची काळजी शाळा आणि महाविद्यालयांना घ्यावी लागेल. शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालये जर प्रोफाइलमध्ये शिक्षकांची नावे भरत नसतील किंवा कामात वेळेवर गडबड केली, तर संबंधित मुख्याध्यापक आणि प्राचार्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version