पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अनाधिकृत फ्लेक्स लावल्याने शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पुणे : शहरात जर बेकायदा फ्लेक्सबाजी केली तर महापालिका अधिनियम २४४,२४५ अन्वये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी आमदारांचे अभिनंदन करणारे फ्लेक्स शहरातील प्रत्येक भागात लावण्यात आले आहेत. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेची निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी देखिल बेकायदा फ्लेक्सबाजी करत आमदाराप्रति निष्ठा दर्शविली आहे. महापालिकेने दिलेल्या इशाऱ्याला सरळ सरळ केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाशचिन्ह विभागाने बघ्याची भुमिका घेतली असून अद्याप पर्यंत काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे आता महापालिका खरच कारवाई करणार की नेहमीप्रमाणे पोकळ धमकी ठरणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (दि.२३) मतमोजणी होणार होती. मतदारसंघात मतदान झाल्यानंतर लगेचच काही उत्साही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर लावून नेत्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. निकालानंतर उत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढण्याची शक्यता होती. ही शक्यता पाहून तसेच विजयी आमदाराच्या कार्यकर्त्यांकडून बेकायदा फ्लेक्सबाजी गृहीत धरुन पुणे महापालिका प्रशासनाने विजयी आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरी सुध्दा महापालिकेच्या इशाऱ्या कोणतीही भीक नघालता थेट शहरभर बेकायदा फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. शहरातील आठ जागांवरील विजयी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अभिनंदनाचे फ्लेक्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आले आहेत.
या फ्लेक्समुळे पदचाऱ्यांना चालणे देखील कठीण झाले आहे. वाहनचालकांना वाहन चालवताना रस्त्याचा अंदाज येत नाही. लाकडी फ्लेक्स असल्याने जोराचा वारा आल्यावर ते फाटून जातात. महापालिकेची निवडणूक जवळ येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत. याकडे मात्र आकाशचिन्ह विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. फलक लावणारे ठेकेदार लाकडाचा सांगडा बांधून जागा अनाधिकृतपणे अरक्षित करतात. कित्येक दिवस एकाच ठिकाणी लाकडी सांगडे बांधलेले दिसून येतात.
विद्युत दिव्याच्या खांबांवर छोट्या आकाराचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. बस थांब्यावर बेकायदा फ्लेक्स लावण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अभिनंदन करत स्वत:ची जाहिरात करण्यावर भर दिला आहे. खराडी बायपास रस्ता, येरवडा, चंदनगर, हडपसर, ससाणे नगर, कात्रज या उपनगर भागासह कर्वे पुरळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, पौड रस्ता, आनंद नगर भाजी मंडई, कोथरूड पोलिस स्टेशन, अशिष गार्डन, पौड फाटा, परमाहंस नागर, गुजरात कॅालनी, महात्मा सोसायटी परिसर, कर्वेनगर परिसर या शहराच्या भागात बेकायदा फ्लेक्सबाजी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण पुणे शहरातच फ्लेक्स लागले आहेत. बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेकडून कारवाई सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
विना परवाना लावणाऱ्या पोस्टर्सवर कारवाई केली जाईल
महापालिकेने काढलेल्या आदेशात न्यायालयात प्रलंबित जनहित याचिकांअंतर्गत वेळोवेळी सविस्तर आदेश पारित करण्यात आल्याचे नमूद केले होते . याअंतर्गत महापालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत शहरात लावण्यात आलेल्या अनधिकृत व विना परवाना होर्डिंग्ज, फलक, बॅनर्स, पोस्टर्स यांच्यावर कारवाई करण्यात येते. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनधिकृत होर्डिंग्ज, फलक, बॅनर, पोस्टर्स लावू नका. परवान्याशिवाय पोस्टर्स, बॅनर, होर्डिंग लावल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम २४४, २४५ अन्वये कारवाई करण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले होते.
महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने कारवाई सुरु केली आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयाकडून बेकायदा फ्लेक्स लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र पोलिसांना दिले जात आहे. आता पर्यंत सुमारे ६० हून अधिक पत्र देण्यात आले आहेत. शहरातील अनेक ठिकाणांवरील फ्लेक्स काढण्यात येत आहेत. याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येईल. बेकायदा फ्लेक्सबाजी करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
– प्रशांत ठोंबरे, आकाशचिन्ह विभाग प्रमुख, पुणे महापालिका.