येरवडा पोलीस ठाण्यात दोन हॉटेलच्या मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल
पुणे : येरवड्यातील कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर या भागात रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल, पबवर पोलिसांनी कारवाईचा बगडा उगारला होता. तसेच वेळेत बंद न करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कल्याणीनगर भागात पुन्हा एकदा हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्यात दोन हॉटेलच्या मालकांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याणीनगर येथील एका हॉटेलचे मालक तसेच मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण खाटमोडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागातील हॉटेलमध्ये नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत तब्बल ७० ते ८० नागरिक एकत्रित करून साऊंड सिस्टीम सुरु ठेवून धिंगाणा घातला जात होता. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा कल्याणीनगर येथील एका हॉटेलवर पोलिसांनी छापा कारवाई केली. त्यावेळी हॉटेलमध्ये विनापरवाना रात्री साऊंड सिस्टीम सुरू असल्याचे आढळून आले. तर, यावेळी हॉटेलमध्ये ४८ नागरिक उपस्थित होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित हॉटेल मालक, मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, दुसऱ्या कारवाईत कल्याणीनगर येथीलच हॉटेलवर छापा टाकून कारवाई केली. त्यावेळी येथेही २५ ते ३० नागरिक आढळून आले. उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून त्यामध्ये अवैधरीत्या साऊंड सिस्टीम सुरू ठेवल्याप्रकरणी हॉटेलचे मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणानंतर या भागात पोलिसांनी हॉटेल, पब चालकांना नियमांचे पालन करण्याचे आदेश इशारा दिला होता. त्यानंतर काही हॉटेल चालकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी तसेच उत्पादन शुल्क विभागाने येथे कारवाई करून तब्बल २० हून अधिक पबला टाळे ठोकले. मात्र, काही दिवसांतच या भागातील हॉटेल, पब संस्कृती पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत हॉटेल आस्थापना सुरू राहत असल्याने येथील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. अनेकदा याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आलेल्या आहेत. मात्र, तरीही हे प्रकार सुरूच आहेत. कल्याणीनगर, विमाननगर, खराड, बाणेर, बालेवाडी भागातील हॉटेलांमध्ये पुन्हा एकदा असे प्रकार सुरु झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कारवाई नंतर आता या भागातही कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.