पुणे: शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एका २८ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, कौटुंबिक वादातून तरुणाने हे पाऊल उचलल्याचं प्राथमिक चौकशीतून आढळून आलं आहे.
सोहेल येणीघुरे (वय २८, रा. पाषाण) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, सोहेल येणीघुरे हा मजुरीचे काम करत होता. त्याचे त्याच्या पत्नीशी वाद झाले होते. घटस्फोट घ्यायचा असल्याचे सांगून तो आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत शनिवारी दुपारी शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात आला होता.
दरम्यान, शनिवारी न्यायालयाला सुट्टी असल्याने न्यायालयाच्या आवारात जास्त लोक नव्हते. न्यायालयाच्या आवारात त्याचे पत्नीशी वाद झाले. वाद सुरू असताना त्याने पत्नीकडील ओढणी घेतली. लाॅयर्स कन्झुमर्स सोसायटीच्या परिसरात असलेल्या एका चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.