पुणे: शिवाजीनगर पोलीस वसाहतीत एका १९ वर्षीय महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शनिवारी (८ फेब्रुवारी) सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रेमभंगामुळे या युवकाने टोकाचं पाऊल उचललं असल्याची शक्यता असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
ऋषीकेश दादा कोकणे (वय १९, रा. शिवाजीनगर पोलीस वसाहत, ई ब्लॉक) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. ऋषीकेशचे वडील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) दौंड विभागात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. तो कला शाखेचा (एसवायबीए) विद्यार्थी होता.
शनिवारी ऋषीकेशचे आई-वडील एका लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले होते. यादरम्यान ऋषीकेशने पोलीस वसाहतीतील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी त्याच्या मित्राने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला उत्तर मिळाळे नाही. यानंतर मित्राने शिवाजीनगर पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात ऋषीकेशने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.