पुणे: मुळशी तालुक्यातील भुकूम येथील स्काय आय मानस लेक सिटीमधील आयरिस-3 सोसायटीच्या लिफ्टबाहेर पाकिस्तानी चलनातील नोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही सोसायटी नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) च्या हद्दीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर प्रकार मानला जात आहे.
सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांनी या संदर्भात बावधन पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सोसायटी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच ही नोट नेमकी कोणी आणि कशासाठी येथे आणली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्याची मागणीही स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.