अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची प्रशासनाची माहिती
पुणे : आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी मिळकत कराबाबत अभय योजना लागू करण्याबाबतचे पत्र प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा पालिकेच अभय योजनेची चर्चा रंगली आहे. मात्र अशा कोणत्याही योजनेवर चर्चा झाली नसून निर्णय झालेला नाही. त्यामुळे मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी पाच दिवस राहिले असून नागरिकांना याचा फायदा घेत कर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.
पुणे महापालिकेकडून मिळकतकराची बिले पाठवली असून सवलतीच्या दरात ३० जून पर्यंत कर भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यामुदतीत १५ दिवसांची मुदत वाढ देण्याची मागणी माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केली आहे. पीटी थ्री फॉर्म चा घोळ अजून चालू आहे, महानगरपालिकेचा सर्वर बंद पडतो आहे. असे कारण सांगण्यात आले असून अभय योजना येणार अशी कुजबूज पालिकेचे काही अधिकारी करत आहेत. त्यामुळे प्रामाणिक करदात्यावर वेळेत रक्कम भरायची आहे परंतु या बाबींचा परिणाम होतो, त्यामुळे ३० जून ही तारीखेची मुदत देण्यात आली. यात आणखीन पंधरा दिवसांनी म्हणजे १५ जुलैपर्यंत सवलतीच्या दरात कर रक्कम भरण्यासाठी द्यावी, असे त्यांचे म्हणणे आहे.
पालिकेकडून मिळकतकराची बीलं नागरिकांना पाठविण्यात आली आहेत. बीलात सवलत देण्यात आली असून सवलतीत बील स्वीकारण्यासाठी ३० जून ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. पालिकेच्या आवाहनानुसार नागरिकांनी कर भरण्यास सुरुवात केली आहे. परंतु, अवघे पाच दिवस राहिलेले असताना अभय योजनेची चर्चा पुन्हा रंगली आहे. परंतु अशी कोणतीही योजना लागू करणार नसल्याचे प्रशासनाचे यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यानंतर आता पालिकेच्या निवडणूकीच्या तोंडावर काही लोकप्रतिनिधींनी अभय योजना राबविण्याबाबतचे पत्र दिले आहे. परंतु त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना या चर्चांवर विश्वास न ठेवता कर वेळेत भरावा आणि भविष्यात लागणाऱ्या दंडापासून वाचावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पालिकेने जाहीर केलेल्या सवलतीचा फायदा घेत तब्बल ९३२ कोटींचा मिळकतकर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पालिकेनेकडून दिलेल्या मुदतीत म्हणजे ३० जूनपर्यंत मिळकतकराची रक्कम भरणाऱ्या मिळकतदारांना बिलात पाच ते दहा टक्के सवलत दिली जात आहे. ही सवलत मिळण्यासाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. या दिवसात सवलतीच्या दरात मिळकतकर भरता येणार आहे. यंदा चालू आर्थिक वर्षामध्ये मिळकतकर विभागाला ३२५० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. अधिकाधिक नागरिकांनी मिळकतकराची रक्कम पालिकेकडे भरावी, यासाठी पालिकेने सुरुवातीचे दोन महिने मिळकत कर भरणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत देण्यास सुरुवात केली आहे. याचा फायदा घेत आतापर्यंत ५ लाख ७९ हजार ५८८ जणांनी सुमारे ९३२ कोटी ३९ लाख रुपयांचा महसूल आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.
पालिकेकडे वेगवेगळ्या प्रकारची सुमारे १७ हजार कोटींची थकबाकी असल्याचे दिसते. मात्र ही संपूर्ण थकबाकी वसूल होणे अशक्य आहे. यामध्ये शहरात असलेल्या मोबाईल टॉवरच्या मिळकतकराची थकबाकी सर्वसाधारण चार हजार कोटी असून ती सर्वात अधिक आहे. त्यापाठोपाठ दुबार मिळकतकराची थकबाकी ४ हजार कोटींच्या घरात आहे. पालिकेने जादा मिळकतकर आकारल्याने न्यायालयात दावे दाखल असलेल्या मिळकतकराची दीड हजार कोटींची तर पालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील १९०० कोटींची थकबाकी आहे.
काही लोकप्रतिनिधींनी मिळकतकराबाबत अभय योजना राबविण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे. परंतु त्यावर प्रशासनाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशी योजना राबविणार नसल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. मिळकतकर सवलतीच्या दरात भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबतचे समाधानकारक कोणतेही कारण समोर आलेले नाही. त्यामुळे मुदतीत वाढ करण्याचा सध्यातरी कोणताही विचार नाही.
– पृथ्वीराज बी. पी, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका.