पुणे : पुणे ग्रँड सायकल टूर या स्पर्धेसाठी शहरातील ६४.८० किमी रस्त्यासाठी तब्बल १२२ कोटी ९७ लाख रुपये खर्च करण्यात येत आहेत. म्हणजेच प्रति किमी रस्त्याचा दुरुस्ती व सौंदर्यकरणासाठी १ कोटी ८९ लाख रुपये होत आहे. प्रत्यक्षात नवीन दोन लेन ५ ते ७ मीटर रुंदीचा डांबरी रस्ता बांधण्यासाठी जास्तीत जास्त ३ कोटी प्रत्येक कि.मी. साठी पुरेसे आहे. मात्र, यात फक्त दुभाजक रंगवणे, थर्मोप्लास्ट पट्टे मारणे, साइन बोर्ड लावणे व खड्डे दुरुस्ती किंवा अस्तरीकरण करण्याच्या नावाखाली आधीच सुस्थितीत असणारे रस्त्यांवर दर किमीला १ कोटी ८९ लाख रुपये/किमी अवास्तव खर्चाचे इस्टीमेट मान्य होते. त्यामुळे फुगविलेल्या इस्टीमेटची पुन्हा पडताळणी करून सुधारित आवश्यक रकमेच्या निविदा काढाव्यात, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे आपले पुणे आपला परिसर संस्थेने केली आहे.
महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण देखभाल दुरुस्तीच्या टेंडरचा फेरविचार करावा. तसेच यातील बहुतांश रस्ते हे काँक्रीटचे आहेत. मग काय या काँक्रीटच्या सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर डांबरीकरण करणार? या सायकल स्पर्धेच्या नावाखाली महापालिका आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करत आहेत, असा आरोप आपले पुणे आपला परिसर संस्थेने तथा माजी विरोधीपक्ष नेता उज्ज्वल केसकर, माजी विरोधीपक्ष नेता सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे.
दरवर्षी मेंटेनन्स व रिइन्स्टेटमेंट या नावाखाली कोट्यवधी रुपयांची कामे प्रत्येक १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर होतात. उदा. औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत पथ विभागाने :- १) पीएमसी रोड/२०२५/७७ :-औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यावर पाणीपुरवठा वाहिनी/निसारण वाहिनी/गॅस वाहिनी वीजवाहिनी तसेच केबल खोदकाम यांचे रिइन्स्टेटमेंट करणे. तसेच इतर काम करणे. (खर्च-६७,७४,४४४ रुपये). २) पीएमसी रोड/२०२५/७८ :- औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरील चेंबर समपातीकरण करणे आरसीसी चेंबर करणे, क्षेत्रीय कार्यालय निहाय मोबाईल मेंटेनन्स युनिटद्वारे देखभाल दुरुस्तीची कामे करणे व तदनुषंगिक इतर कामे करणे. (खर्च-८४,७४,५१८ रुपये). ३) पीएमसी रोड/२०२५/७९ :-औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयांचे कार्यक्षेत्रात विविध रस्त्यावर पाणीपुरवठा वाहिनी/निसारण वाहिनी/गॅस वाहिनी वीज वाहिनी तसेच केबल खोदकाम यांचे रिइन्स्टेटमेंट करणे. तसेच इतर काम करणे (खर्च-६७,४४,४४४ रुपये). ४) पीएमसी रोड/२०२५/८० :- औंध बाणेर क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील नवीन समाविष्ट गावठी हद्दीस सूचित केलेल्या रस्ते विषयक दुरुस्तीचे कामे व रिइन्स्टेटमेंटची कामे करणे (खर्च-४२,०१,५२७ रुपये), असे एकूण २ कोटी ६२ लाख रुपची निविदा फक्त एकाच क्षेत्रीय कार्यालय कार्यक्षेत्रात पथ मुख्य खात्याचा वतीने काढलेल्या आहेत. (१५ क्षेत्रीय कार्यालय एकूण कामे :- ४० कोटी) या पण कामांचे स्वरूप पॅकेजमधील निविदेप्रमाणेच आहे, तर मग याच कामांतून सायकल स्पर्धेसाठी आवश्यक कामे केली तर महापालिका तिजोरीतील सर्वसामान्य करदात्यांचे १२५ कोटी रुपये वाचतील. तसेच महापालिकेच्या डांबर प्लांट वरून रोज हजारो मेट्रिक टन डांबर, इमलशन व इतर सामग्री शहराच्या वेगवेगळ्या भागात वापरली जाते. तो माल वापरून पण योग्य नियोजनातून कामे करणे शक्य आहे.