Site icon द पब्लिक न्यूज

धायरीच्या डीपी रस्त्यांसाठी आयुक्त, खासदारांना ग्रामस्थांचे साष्टांग दंडवत

Dhayari Pahani1

पुणे : धायरीला वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ मोजणी करून रस्त्याची कामे त्वरित मार्गी लावा, अशी मागणी धायरीकरांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. यावर त्वरित कारवाई करून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन देण्यात आले. धायरी ग्रामस्थांच्या प्रचंड मागणीनंतर आयुक्तांनी पाहणी दौरा केला. त्याबद्दल ग्रामस्थ धनंजय बेनकर, सनी रायकर, निलेश दमिस्ट आणि इतरांनी आयुक्तांना साष्टांग दंडवत घातले.

धायरीतील मुख्य चार डीपी रस्त्यांची मोजणी कागदावरच राहिली आहे. भूमी अभिलेख भूमि अभिलेख विभागाचा गलथान कारभारामुळे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथील चारही डीपी रस्त्यांचे काम रखडले आहे. याबाबत पुणे शहर आम आदमी पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पत्र पाठवले होते. त्यावर काम करण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही सुरू झाली नाही. यावर पुन्हा धायरी ग्रामस्थांनी विविध आंदोलने केली. त्याचीच परिणीती म्हणून आयुक्त राम आणि स्थानिक खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी करून लोकांचे म्हणणे ऐकून घेतले.

डीपी रस्त्यांच्या मोजणीसाठी महापालिकेने गेल्या वर्षी २६ फेब्रुवारी २०२४ रोजी भूमि अभिलेख विभागाला रितसर पैसे भरले आहेत. मात्र, भ्रष्ट कामांत अडकलेल्या भूमि अभिलेख विभागाने प्रत्यक्षात रस्त्यांची मोजणीच पूर्ण केली नाही. त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. धायरी येथील सावित्री गार्डन ते नांदेड फाटा, काका चव्हाण बंगला ते श्री कंट्रोल चौक, बेनकर वस्ती व हायब्लिज सोसायटी ते लक्ष्मी लॉज या चार डीपी रस्त्यांची कामे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. तर दुसरीकडे प्रचंड लोकसंख्येच्या धायरी येथे पर्यायी रस्ते नसल्याने वाहतूककोंडी, अपघात अशा समस्या गंभीर बनल्या आहेत.

विद्यार्थ्यांसह कामगार नागरिकांना दररोज मृत्यूशी झुंज देत प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. तरीही शासनाने याकडे दुर्लक्ष करत आहे. भूमि अभिलेख विभागाला रस्त्यांच्या मोजणीसाठी महापालिकेने रितसर पैसे भरले. मात्र, तरीही मोजणी पूर्ण झाली नाही. याबाबत आवाज उठवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, खासदार सुप्रिया सुळे, काका चव्हाण, सचिन दोडके, धनंजय बेनकर, सनी रायकर, निलेश दमिष्टे, यशवंत लायगुडे, प्रभावती भूमकर, पोपट खेडेकर, कुशल करंजावणे आणि धायरी ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version