पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर; काही प्रभागांच्या नावांसह हद्दीत बदल
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. काही प्रभागातील हद्दीत बदल झाल्यानेइच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दी ओलांडल्या होत्या, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले नव्हते. असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पुणेकरांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या होत्या.
प्रभाग क्रमांक 15 चा थिटे वस्ती चा भाग प्रभाग क्रमांक चारला जोडला आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये वानवडी शिंदे वस्ती या प्रभागातील शिंदे वस्तीचा काही भाग प्रभाग क्रमांक 14 ला जोडण्यात आला आहे. प्रारूप मध्ये रस्त्याने शिंदे वस्ती विभागल्याने मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 14 चा मगरपट्टा सिटी समोरील रस्त्याचा पलीकडचा भाग हा प्रभाग क्रमांक 17 ला जोडण्यात आला आहे. बिबवेवाडी महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के के मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक 38 अप्पर सुपर इंदिरानगर ला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 34 धनकवडी चा आंबेगाव दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग 38 ला जोडण्यात आला आहे तसेच कोळेवाडी जांभूळवाडी हा भाग देखील 38 ला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 चा सुखसागर नगरचा भाग प्रभाग 39 कोंडवा येवलेवाडी ला जोडण्यात आला आहे. विशेष असे की या प्रभागावरी सर्वाधिक हरकती आल्या होत्या.