वडगावशेरी मतदारसंघातील पाणीटंचाईबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांचा आंदोलनाचा इशारा
पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहेत. अत्यल्प कालावधीसाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विशेषतः महिला वर्गाला प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा थेट आरोप आमदार बापूसाहेब पठारे यांनी केला आहे. तसेच, महापालिका प्रशासनाविरोधात येत्या ७ ऑक्टोबर रोजी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, की “पुणे महानगरपालिका आयुक्त, मुख्य अभियंता व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तसेच प्रत्यक्ष पाठपुरावा करूनही अद्यापही कोणतीही ठोस सुधारणा किंवा उपाययोजना राबवण्यात आलेली नाही. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ११ मार्च रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्षांच्या सूचनेनंतरसुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून दिलेल्या लेखी आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी, नागरिकांच्या पाणीटंचाईचा प्रश्न आजही ‘जैसे थे’ आहे.
धानोरी, लोहगाव, विमाननगर, खराडी व वडगावशेरी या भागांमध्ये सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असून ती तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समान पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला दररोज किमान अडीच तास पाणी मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका पठारे यांनी मांडली आहे.
प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न न सुटल्याने नागरिकांसह रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे सांगत ७ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता पुणे महानगरपालिकेवर ‘धडक मोर्चा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
—–
आमदार पठारे यांच्या धडक मोर्चा आंदोलनात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहेत.
– दररोज किमान अडीच तास नियमित पाणीपुरवठा व्हावा व सुरू असलेल्या पाण्याच्या टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत.
– प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा.
– मतदारसंघातील स्व. राजीव गांधी, कळस, लोहगाव, वडगावशेरी व खराडी येथील महापालिका रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.
– लोहगाव-वाघोली भागातील ड्रेनेज व पावसाळी पाण्याच्या लाईनची कामे पूर्ण करावीत.
– येरवडा, धानोरी, कळस, वडगावशेरी, लोहगाव भागात पूरस्थिती टाळण्यासाठी नाले व जलनिस्सारण कामे तातडीने राबवावीत.
– डी.पी. व आर.पी. रस्ते तसेच महत्त्वाचे पूल जसे की खराडी–शिवणे रस्ता, विश्रांतवाडी चौक, बिंदू माधव ठाकरे चौक यांची कामे लवकर पूर्ण करावीत.
– महापालिकेच्या ताब्यातील गार्डनकरीता आरक्षित जागांवर गार्डन विकसित करावीत.
– लोहगाव, धानोरी, वडगाव शेरी, वाघोली भागातील स्मशानभूमी विकसित कराव्यात.
– लोहगाव व वाघोली गावांचा विकास आराखडा तातडीने मंजूर करावा.
– महापालिकेच्या मिळकतकर धारकांसाठी अभय योजना राबवून नागरिकांना दिलासा द्यावा.
——-
सदर मागण्यांसाठी प्रशासनाशी आतापर्यंत झालेल्या पत्रव्यवहाराचे सर्व पुरावेही आमदार पठारे यांनी सादर केले आहेत. १४ ऑगस्टपासून ३ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनाशी झालेल्या सलग पत्रव्यवहारानंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने हे आंदोलन हाच शेवटचा पर्याय उरल्याचे त्यांनी सांगितले.
With Regards
Amol Avchite
Correspondent
+91- 96373 71432