प्लॅन करूनच मारहाण केल्याचा आमदार बापूसाहेब पठारे यांचा आरोप
पुणे : लोहगावात एका माजी सैनिकाच्या सेवापूर्ती निमित आयोजित कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्यावेळी अचानक माझ्यासोबत वाद घालण्यास सुरुवात झाली. त्यानंतर थेट अंगावर धावून आले. तसेच माझ्या अंगरक्षकाला आणि चालकाला मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे बंडू खांदवे यांनी कट रचून माझ्यात हल्ला केला. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आणि वडगाव शेरी मतदार संघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केला.
आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर शनिवारी रात्री १० च्या सुमारास लोहगाव परिसरात मारहाण झाली. या प्रकाराची माहिती देण्यासाठी खराडीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, सुरेंद्र पठारे आदी उपस्थित होते.
आमदार पठारे म्हणाले की, ज्या प्रश्नांबाबत आंदोलन ठेवले आहे, ती कामे होणार आहेत. असे सांगितल्यानंतर बंडू खांदवे याने वाद घालण्यास सुरुवात केली. मी आंदोलन ठेवलं तुम्ही का विरोध करता असे म्हणत मला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. माझ्या अंगरक्षकाला देखील मारण्यात आले. तसेच चालक शकील शेख याला बेदम मारहाण करण्यात आली. माझ्या भावाच्या मुलगा सचिन पठारे याला तो पठारे आहे, म्हणून मारहाण केली. दोन मिनिटातच त्याचे मोठ्या संख्येने साथीदार आले आणि माझ्या चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
१०० हून अधिक लोक त्याने जमा केले होते. आम्ही पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेले होतो. त्यावेळी त्याने हा प्रकार केला. हा प्रकार त्याने ठरवूनच केला आहे. असे आमदार पठारे यांनी सांगितले.
लोहगावात रस्त्याचे प्रश्न आहेत. ८ डिसेंबर २०२३ ल हे रस्ते मंजूर होते. पण विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांनी रस्ते केले नाहीत. असे रस्ते करता येत नाहीत पाइपलाइन आणि ड्रेनेज टाकावी लागतात. ते काम करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. रस्ते झाले नाहीत म्हणून आंदोलन करत राजकारण करण्याचा हा प्रकार होता, म्हणून हे सगळे घडलं. रात्री उशिर झाला होता म्हणून गुन्हा दाखल झाला नाही. ते मुद्दाम भांडण काढत आहेत, महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करत आहेत. ते अजित पवार गटाचे आहेत. माजी आमदार सुनील टिंगरे यांचे ते कार्यकर्ते होते. मात्र यात टिंगरे यांचा कोणताही हात नाही. त्यांचे केवळ कार्यकर्ते होते. खांदवे याने सगळे प्लॅन केले होते. आधीच लोक जमा केली होती. असेही पठारे यांनी यावेळी सांगितले.
पोलिसांनी रात्री जबाब नोंदवला गेला नाही. चालक आणि पुतण्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे.
असे पठारे म्हणाले.
…..
अजित पवारांकडे तक्रार करणार
आंदोलन करणार म्हणून आम्ही शिव्या दिल्या नाहीत. सगळे आंदोलन करू शकतात. निवडणुका डोळ्या समोर ठेवून आमच्यावर हल्ला केला. वेगळं वातावरण तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. माझे सगळ्या नेत्यांशी बोलणं झाले आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार करणार आहे. ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
……
नेमका काय घडला प्रकार
आमदार पठारे हे लोहगाव परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते बंडू खांदवे यांनी वाद घातला. या वादाचे रूपांतर काही वेळातच जोरदार हाणामारीत झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
…
घटना घडली त्या ठिकाणी सगळे सीसीटीव्ही होते. फुटेज पाहिल्यानंतर खुलासे होतील. बंडू खांदवे यांनी पॉलिटिकल स्टंट केला. त्यांनी नंतर सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न केला. प्रकरणाची शहानिशा सीसीटीव्ही मार्फत होईल. पोलिसांनी ते सगळ ताब्यात घेतले आहे. हेतू मारहाणीचाच होता.
– सुरेंद्र पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
….
आमदार बापूसाहेब पठारे यांना माझ्या वडिलांसमान मानतो. त्यांचे आणि संबंध जिव्हाळ्याचे आहेत. त्यांनी दुसऱ्याचा राग माझ्यावर काढला. गावातील प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करणार होतो. त्यांनीच माझ्या व्हॉट्स अप मेसेजला रिप्लाय दिला होता. कार्यक्रमात दिसल्यानंतर त्यांनीच मला विचारणा केली. मी हल्ल्याचा कट रचला असे ते म्हणत आहेत, पण त्यांनीच हा कट रचला आहे. पठारे यांचा गेल्या काही निवडणुकांमध्ये मी प्रचार केला होता. या वेळी मात्र मी माझ्या पक्षाची प्रामाणिक राहिलो. आमच्या गावातील ४०० ते ५०० माणसं होती. त्यांच्याच मुलाने मिडियाला त्यांची ५ हजार माणसं आली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे हा कट मी नव्हे तर त्यांनीच रचला होता. जन आक्रोश आंदोलन त्यांच्या विरोधात नव्हते, ते प्रशासनाच्या विरोधात होते. मी त्यांच्यासोबत असे वागू शकत नाही. किंवा ते माझ्याशी अशा प्रकारे वागणार नाहीत याची मला खात्री आहे. पण कोणाच्या तरी सांगण्यावरून ते असे बोलत आहेत. त्यांनी माझ्या नावाने पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. त्यामुळे मी ही कोणती तक्रार केलेली नाही. यात राजकारण करण्याचा संबंध येत नाही.
– बंडू खांदवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (अजित पवार गट)