कोजागरीसाठी पुण्यातील उद्याने आज रात्री बारापर्यंत सुरू राहणार
पुणे : कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक परिसरातील बागा आणि उद्यानांमध्ये जमा होतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व उद्याने सोमवार (दि.6) ऑक्टोबर रोजी रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत 216 उद्याने, मत्स्यालय व प्राणिसंग्रहालये विकसित करण्यात आली आहेत. या सर्वांच्या देखभाल दुरुस्तीचे काम उद्यान विभागामार्फत करण्यात येते. शहरातील सर्व उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उद्यानांमध्ये येतात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही कोजागरीसाठी महापालिकेची उद्याने रात्री बारापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक महापालिका मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी जारी केले आहे. त्यानुसार सोमवारी शहरातील सर्व उद्याने सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4.30 ते रात्री 12 पर्यंत सुरु राहणार आहेत. त्यामुळे शहरातील सारसबाग, डेक्कन परिसरातील छत्रपती श्री संभाजी महाराज उद्यान, मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका उद्यान, कोथरूड येथील थोरात उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, कमला नेहरू उद्यान, हडपसरमधील लोहिया उद्यान, सहकारनगरमधील काकासाहेब गाडगीळ उद्यान यांसह त्या-त्या भागातील उद्याने खुली राहणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन घोरपडे यांनी केले आहे.