Site icon द पब्लिक न्यूज

कोंढवा बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

WhatsApp Image 2025-10-06 at 6.37.29 PM (2)
PUNE : पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत कोंढवा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच आहे. महापालिकेच्या विशेष पथकाने सोमवारी  (दि. ६) कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत सुमारे ५,६०० चौ.फुट आरसीसी बांधकाम पाडले. या कारवाईत दोन बहुमजली इमारती देखील पाडण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली.

कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. या बाबत अनेकांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. छोट्या जागेत महापालिकेची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात असून ती नागरिकांना खोटी कागदपत्रे दाखवून विकली जात आहे. त्यामुळे अनेकांची फसवणूक झाल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या होत्या. यामुळे अशा बांधकामांवर पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी  कोंढवा बुद्रुक येथील लक्ष्मी नगर गली नं. ८, सर्वे नं. ३ येथे असलेल्या तीन मजली इमारतीवर आणि कोंढवा खुर्द येथील मलिक नगर व साईबाबा नगर (सर्वे नं. ६२) येथील दोन मजल्यांच्या दोन इमारतींवर कारवाई करून त्या पाडण्यात आल्या. या करवाईयसाठी  महापालिकेच्या विशेष पथकात ६ बिगारी, ५ पोलीस कर्मचारी, १ जेसीबी, ४ ब्रेकर, २ गॅस कटर, ५ कनिष्ठ अभियंता आणि २ उपअभियंता  होते.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कारवाईनंतर या इमारती धोकादायक अवस्थेत असल्याने त्यांचा वापर करू नये. अलीकडेच शहरातील विविध भागात अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई सुरू केली असून, नागरिकांनी फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी अधिकृत परवानगी घेतलेल्या प्रकल्पांमधूनच घर खरेदी करण्याचे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले आहे.

Exit mobile version