दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहेत. त्यात महापालिका व इतर यंत्रणांमार्फत शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदाईची कामे सुरू आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडी होत असल्याने, ही कामे दिवाळीपर्यंत थांबवा, अशी मागणी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिकेकडे केली आहे.
माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी व माजी मंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांची भेट घेत घेऊन त्यांना या बाबत शुक्रवारी (दि १०) निवेदन दिले. या शिष्टमंडळात अविनाश बागवे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, प्रथमेश आबनावे, मुख्तार शेख, आयुब पठाण, चेतन आगरवाल, सुरेश कांबळे, ॲड. प्रवीण करपे, मिलिंद पोकळे, अमोल धर्मावत आदी सहभागी झाले होते.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियोजित सायकल स्पर्धेचा ‘ट्रॅक’ करण्यासाठी आणि सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी रस्ते खोदले जात आहेत. हे काम आवश्यकच आहे. पण, सध्या सणासुदीच्या दिवसांतील वाढत्या रहदारीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असून त्यात रस्ते खोदाई सुरू असल्याने आणखी भर पडत आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे दिवाळी होई पर्यंत स्थगित ठेवावीत,’अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे. हे खोदकाम करताना सोसायट्यांच्या प्रवेशद्वारातही खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहनेही बाहेर काढणे शक्य होत नसल्याच्या प्रश्नांकडे देखील जोशी यांनी लक्ष वेधले.