Site icon द पब्लिक न्यूज

जैन समाजाकडून काढला जाणार देशभर मूक मोर्चा

जैन समाजाकडून काढला जाणार देशभर मूक मोर्चा
जैन बोर्डिंग जमीन प्रकरण : व्यवहार रद्द करा; अन्यथा १ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा आचार्य गुप्तीनंद महाराजांचा इशारा

पुणे : एखादी जमीन समाजाला दान केल्यानंतर किंवा एखाद्या समाजासाठी आरक्षित असलेली जमीन ती कोणालाही विकण्याचा अधिकार नाही. मात्र, पुण्यात जैन समाजाची जमीन विकण्याची घटना घडली असून ट्रस्टींनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला आहे. मात्र, यापुढील काळात देशभरात कुठेही जैन समाजाच्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार होता कामा नये. याबाबत सरकारने कडक पाऊल उचलावे, जैन समाजाच्या बोर्डिंग जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा, अशी मागणी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी केली आहे. तसेच मागणीसाठी उद्या सोमवार (दि. २७) रोजी देशभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे.

शिवाजीनगरमधील मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगमध्ये देशभरातील जैन संघटनांची रविवारी (दि. २६) रोजी बैठक झाली. जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर कठोर टीका होत आहे. तर मागील काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर दररोज नवनवीन आरोप करत आहेत. आता या पार्श्वभूमीवर आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी हा जमीन व्यवहार रद्द झाला पाहिजे. अन्यथा आम्ही याविरोधात येत्या १ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

आचार्य गुप्तीनंद महाराज म्हणाले की, २७ तारखेला देशभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे. तर २८ तारखेला सुनावणी असल्याने त्यावेळी पूजा करण्यात येणार आहे. तसेच २९ तारखेला एक दिवसीय उपवास केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जमीन विक्रीचा व्यवहार रद्द झाला नाही, तर अन्यथा १ नोव्हेंबरपासून अन्नत्याग उपोषण सुरू करणार आहे. शनिवारी (दि. २५) रोजी जैन बोर्डिंगच्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आले होते. त्यावेळी आमच्या मंदिरात येऊन समाजासमोर तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींशी मोहोळ यांनी सांगितले की, मी आपल्या जैन समाजासोबत आहे. जमीन व्यवहार प्रकरण १०० टक्के रद्द केले जाईल, असा शब्द मोहोळ यांनी दिला आहे.

तर माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, देशभरातील जैन समाजाच्या अनेक ठिकाणच्या जमिनीत गैरव्यवहार झाले आहेत. याबाबत सरकारने कायदा करावा. त्यात या ट्रस्टवर काम करणाºया विश्वास्तांचे अधिकार मर्यादित करावे. तसेच मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार तात्काळ रद्द करा. या व्यवहाराचे सेल डीड रद्द करण्यात यावे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात यावे.

पालकमंत्री अजित पवारांची डोळेजाक खेदजनक : आचार्य गुप्तीनंद महाराज  
जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरण समोर येऊन १५ दिवस झाले आहेत. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन केले होते. परंतु, त्यांनी अ‍ॅक्शन घेतल्याने आठ दिवसांची स्थगिती या व्यवहाराला दिली आहे. मात्र, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्वात प्रथम दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यायला येणे गरजेचे होते. मात्र, ते काही अद्यापपर्यंत आलेले नाहीत, हे अत्यंत खेदजनक आहे. महापालिका निवडणुका जवळ आहेत, याचा विचार अजित पवारांनी करावा, असा इशारा आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी दिला आहे.

Exit mobile version