Site icon द पब्लिक न्यूज

जैन बोर्डिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी धंगेकरांचे पंतप्रधानांना पत्र

जैन बोर्डिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी धंगेकरांचे पंतप्रधानांना पत्र

 बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा  : मुरलीधर मोहोळांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची केली मागणी

पुणे : जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा आणि प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. तसेच सोमवार (दि. २७) रोजी पासून हा व्यवहार रद्द होईपर्यंत मी तमाम पुणेकरांसह जैन बोर्डिंग येथे बेमुदत धरणे आंदोलनास बसणार आहे, असे धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रवींद्र धंगेकर यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, गेल्या अठरा दिवसांच्या संपूर्ण संघर्षात माझ्यासह अनेक लोकांनी, अनेक वेळा या गोष्टीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पुरावे दिले आहे. व्यवहारातील सर्वच व्यक्ती आणि संस्था या मुरलीधर मोहोळ यांच्या संबंधित आहेत. जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याबरोबरच समाजातील मंदिरे व देवस्थानच्या जागा हडप करणाºया टोळीवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणाची निपक्ष:पाती चौकशी होणे गरजेचे आहे. निपक्ष:पाती चौकशी तेव्हा शक्य होणार आहे. जेव्हा या प्रकरणात मुरलीधर मोहोळ हे आपल्या पदाचा राजीनामा देतील. कारण त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाच्या प्रभावाखालीच हा इतका मोठा गैरव्यवहार घडला आहे. त्यामुळे ही चौकशी होत असताना देखील त्यांनी मंत्रीपदावर राहणे योग्य नाही. त्यामुळे मोहोळ यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

पंतप्रधानांसह देशाचे गृह तथा सहकारमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देखील आपण या पत्राच्या प्रती पाठवत आहोत. त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तातडीने हा व्यवहार आपल्या विशेष अधिकारातून रद्द करावा. तसेच या प्रकरणाची कठोर चौकशी होईपर्यंत मुरलीधर मोहोळ यांचा राज्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

Exit mobile version