“वाघोलीला डर्टी कोणी केलं?” ; रामकृष्ण सातव पाटील यांचा आयुक्तांना सवाल
पुणे : महापालिका हद्दीत वाघोली गाव येवून तब्बल ६४ महिने झाले आहेत. गावकरी महापालिकेला कोट्यवधी रुपयांचा कर भरतात. त्यानंतरही महापालिका प्रशासनाला वाघोलीत विकास कामे करण्याचा विसर पडला. उलट महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी “माझ्या मते पुण्यात सर्वात डर्टी भाग वाघोली आहे,” असे विधान केले आहे. यामुळे आता चांगलेच वातावरण तापले आहे. तसेच या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी आयुक्तांना “वाघोलीला डर्टी कोणी केलं?” असा संतापजनक सवाल उपस्थित केला आहे.
आयुक्त किशोर राम यांनी असे वक्तव्य करुन महापालिका प्रशासनाचे अपयश एकप्रकार सिध्द केले आहे. महापालिकेत सामावेश झाल्यानंतर गावच विकास होईल, असे वाटले होते. महापालिकेने गावकऱ्यांकडून कर वसूली करुन त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. असा आरोप करुन सातव पाटील यांनी आठवण करून दिली की, 2021 साली वाघोली ग्रामपंचायतीकडे स्वच्छतेसाठी तब्बल 54 कर्मचारी, 25 कचरा गाड्या, ट्रॅक्टर, JCB, 35 कंटेनर आणि 2 टेम्पो अशी मोठी यंत्रसामग्री होती. “त्या काळात वाघोली महाराष्ट्रातील सर्वात सक्षम ग्रामपंचायतींपैकी एक होती. पण महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर विकासाला खीळ बसली आणि रस्ते, कचरा, गटार या समस्या वाढल्या,” असं त्यांनी नमूद केलं.
त्यामुळे आता वाघोलीला “डर्टी” म्हणणं म्हणजे प्रशासनाच्या स्वतःच्या अपयशाकडे दुर्लक्ष करणं असल्याचं सातव पाटील यांनी स्पष्ट केलं. “जर वाघोली गाव डर्टी आहे, तर त्यासाठी जबाबदार कोण?” असा थेट सवाल सातव पाटील यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. नागरिकांनी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरला आहे. मात्र, त्या बदल्यात गावात मूलभूत सुविधा देण्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला याचा हिशेब प्रशासनाने द्यावा. “गटारे, ट्रॅफिक, रस्ते, स्वच्छता यांवर नेमके किती काम झाले, हे महापालिका प्रशासनाने स्पष्टपणे सांगावे,” अशी मागणी सातव पाटील यांनी केली आहे.
वाघोली हे आमच्या अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे गाव असून, त्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आम्ही व आमचे सहकारी लोकप्रतिनिधी तळमिळीने काम करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, साल २०२१ मध्ये वाघोली ग्रामपंचायतीकडे २३ स्वच्छता कर्मचारी, २५ घनकचरा गाड्या, १ ट्रॅक्टर, १ JCB, ३५ बकेट कंटेनर, २ टेम्पो, २५ ड्रायव्हर व ६ कर्मचारी असे एकूण ५४ कर्मचारी केवळ स्वच्छतेसाठी कार्यरत होते. “इतकी सुसज्ज व्यवस्था असलेली ग्रामपंचायत त्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात दुर्मिळ होती,” असा दावा क त्यांनी केला आहे.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर मात्र वाघोलीच्या विकासाला खीळ बसली. कचऱ्याचे ढिगारे, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि गटारांच्या समस्यांनी नागरिकांचे जीवन त्रस्त झाले आहे.
“महापालिका आयुक्तांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे वाघोलीबद्दल लोकांमध्ये नकारात्मक भावना निर्माण होण्याचा धोका आहे. अशा वक्तव्याने येथील व्यापार, गुंतवणूक आणि गृहविकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या विधानाचा खुलासा करावा आणि वाघोलीच्या विकासासाठी ठोस योजना जाहीर करावी,” अशी मागणी सातव पाटील यांनी केली आहे.