
पुणे : म्हाळुंगेत रस्त्यांची झालेली दुरवस्था, कचऱ्याचा प्रश्न, पाणी टंचाई, आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या रस्त्यात गेलेल्या जागेच्या मोबदल्याचा प्रश्न अशा अनेक विषयांनी त्रस्त असलेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात रविवारी आंदोलन केले. हायटेक सिटीच्या नावाखाली फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करत यावेळी प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सोसायट्यांमधील नागरिक व शेतकरी पहिल्यांदाच या आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
झोपलेल्या प्रशासनाला जग आणण्यासाठी आणि नागरिकांचा, शेतकऱ्यांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी जयेश मुरकुटे फाउंडेशनचे जयेश मुरकुटे यांच्या वतीने या जनआंदोलनाचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी नागरिकांनी पोटतिडकीने आपल्या समस्या मांडल्या. कुल-एचोलोक,व्हीटीपी अल्पाइन, व्हीटीपी लिओनारा, व्हीटीपी बेलाअर, गोदरेज हिलसाइड १, गोदरेज हिलसाइड २, व्हीटीपी, एथेरियस, गोदरेज ग्रीनकोव्ह, रिवेरिया आदी सोसायटीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
जयेश मुरकुटे म्हणाले, म्हाळुंगे टाऊन प्लॅनिंग योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. १० वर्षांपासून योजना रखडून पडली आहे. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अडकवून ठेवली गेली, आता या शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. ‘हाय-टेक सिटी’चे फक्त स्वप्न दाखवले गेले. पण प्रत्येक्षात काहीच झाले नाही. टाऊनशिपमध्ये आलेल्या नागरिकांनाही हेच गाजर दाखवण्यात आले. अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहेत. मूलभूत सुविधाही त्यांना पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता प्रचंड असंतोष दिसत आहे. पुणे महापालिका, बांधकाम विभाग आणि पीएमआरडीए यांच्यात कोणताही ताळमेळ नाही, त्यामुळे विकासकामे रखडून पडली आहेत. लोकांना विश्वासात घेऊन ही योजना तातडीने राबवावी, अन्यथा रद्द करावी. आजची ही फक्त पहिली पायरी आहे. इथून पुढे आम्ही थांबणार नाही. नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी या पेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल.
महाळुंगे गाव पुणे महापालिकेत समाविष्ट झाले असले तरी या भागाचा विकास टाऊन प्लॅनिंग मार्फत केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे येथील डेव्हलपमेंट प्लॅन मधील रस्ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्नही प्रलंबित आहे. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर पालिकेने डेव्हलपमेंट आराखडा तयार करावा व टाऊन प्लॅनिंग योजनेतून गाव वगळण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, अशोक मुरकुटे, शांताराम पाडाळे, माजी सरपंच नामदेव गोलांडे, माजी सरपंच मयूर भांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे उपाध्यक्ष संदीप बालवडकर, सोपानराव पाडाळे, लक्ष्मण पाडाळे बापूसाहेब पाडाळे, ज्योती चांदेरे, अंकुश पाडाळे, संजय मुरकुटे, नितीन पायगुडे रणजीत पाडाळे, सागर चिव्हे, तुषार हगवणे, रितेश पाडळे, रितेश निकाळजे, हर्षदा थिटे, प्रमिला मुरकुटे, प्रियंका सिंग, ज्योती सिंग, आशिष बापट, अमित कुटे, राहुल कदम, संदीप तनपुरे, शुभम सिंग, प्रशांत कुमार, हरिनारायण पटेल आदी उपस्थित होते.
—-
टाऊन प्लॅनिंग योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. १० वर्षांपासून योजना रखडून पडली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अडकवून ठेवली गेली, ‘हाय-टेक सिटी’चे फक्त स्वप्न दाखवले. टाऊनशिपमध्ये आलेल्या नागरिकांनाही हेच गाजर दाखवण्यात आले. लोकांना विश्वासात घेऊन ही योजना तातडीने राबवावी, अन्यथा रद्द करावी.
– जयेश मुरकुटे, कार्याध्यक्ष, कोथरूड विधानसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार).