
PUNE : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता येत्या १० ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत जाहीर केली जाणार आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी केली जात आहे. निवडणुकीसाठी पाच हजार मतदान केंद्रांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने जागांची पाहणी केली जाणार आहे. तसेच मतदार याद्यांचा घोळ टाळण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’चा उपयोग केला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांची अंतिम रचना झाल्यामुळे मतदार याद्यांवर काम केले जाणार आहे. प्रभाग रचनेनुसार आता मतदार याद्यांची विभागणी करणे, मतदान केंद्रांची निश्चिती करणे आदी प्रक्रीया केल्या जाणार आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये बुथ निहाय कामांचे नियोजन करण्याविषयी चर्चा झाली. असेही त्यांनी सांगितले.
मतदान केंद्रांसंदर्भातील जबाबदारी उपायुक्त अरविंद माळी यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुक झाली होती, त्यावेळी किती आणि कोणती मतदान केंद्रे होती. आणखी किती ठिकाणी नवीन मतदान केंद्रे करता येईल. तसेच या मतदान केंद्रांसाठी जागा मिळवणे आदी संदर्भात तयारी करण्यास सांगण्यात आले आहे, असे दिवटे यांनी सांगितले.
प्रभाग रचना अंतिम झाल्याने मतदार याद्यांची विभागणी करावी लागणार आहे. प्रभाग निहाय याद्यांची फोडणी करण्यासाठी ‘सॉफ्टवेअर’चा वापर केला जाणार आहे. या कामासाठी पुर्वी मनुष्यबळाचा उपयोग केला जात होता. परंतु आता ‘सॉफ्टवेअर’चा उपयोग केल्याने मतदार यांद्यातील घोळ टाळता येणार आहे. एकाच कुटुंबातील मतदारांची वेगवेगळ्या प्रभांगात, मतदार केंद्रांत मतदानासाठी नावे येतात. तसेच काही नावे वगळली जातात असे घोळ होतात. ते टाळण्यासाठी काळजी घेण्यात येणार आहे, असे दिवटे यांनी नमूद केले.
====