
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे बंडू खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल ; बापूसाहेब पठारे मारहाण प्रकरण
PUNE:वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) कार्यकर्ते बंडू खांदवे यांच्याकडून शनिवारी (दि.४)
मारहाण करण्यात आली होती. या प्रकारामुळे राजकारणात खळबळ उडाली होती. खांदवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बापूसाहेब पठारे यांचे चालक शकील अजमोद्दीन शोख (वय 46, रा. गणपती हौसिंग सोसायटी, तुकारामनगर, खराडी) यांनी याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शेख यांच्या तक्रारीनंतर विमानतळ पोलिस ठाण्यात बंडु शहाजी खांदवे (रा. लोहगाव) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर मोझे, विलास खांदवे, कालिदास खांदवे, गणेश खांदवे, रामेश्वर पोळ, मेघराज खांदवे, प्रतीक खांदवे (रा. दादाची वस्ती), सागर करजे, ओमकार ऊर्फ ओम्या खांदवे, तुकाराम खांदवे, हरीदास खांदवे, रामदास खांदवे, मंगेश खांदवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
दिलेल्या तक्रारीनुसार ४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास लोहगावमधील संत नगर येथील गाथा लॉन्समध्ये आमदार पठारे यांना मारहाण करण्यात आली होती. लोहगाव परिसरात सुरु असलेल्या जलवाहिनी व सांडपाणी वाहिनीच्या अपूर्ण कामांमुळे रस्ते कामे लांबणीवर टाकावीत, असे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सुचवले होते. याच पार्श्वभूमीवर बंडु खांदवे व त्याचे काही समर्थक गाथा लॉन्स येथे पठारे यांना जाब विचारण्यासाठी गेले होते. तेव्हा दोन्ही गटांत वाद झाला.
दरम्यान, बंडु खांदवे यांनी आमदार पठारे यांना मारहाण केली. त्यांना वाचवण्यासाठी फिर्यादी शेख पुढे गेले असता, त्यांच्यावर बंडू खांदवे, शेखर मोझे व इतरांनी लाथाबुक्क्यांनी व जड वस्तूंनी हल्ला केला. या झटापटीच्या वेळी त्यांच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोनसाखळी आणि रोख रक्कम एक हजार रुपये असा एकूण ५१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव अधिक तपास करत आहेत.