
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणात कोण कुठल्या गटाचा, पक्षाचा, कोणाच्या जवळचा कार्यकर्ता, कोणाबरोबर फोटो आहे असले काही पाहू नका. जर चूक असेल, कोणी कायदा हातात घेत असेल, नियमांची पायामल्ली करत असेल, तर त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याच्या उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरात राष्ट्रवादी मिलन आणि पक्षप्रवेश कार्यक्रमांचा धडाका लावला होता. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
गुंड निलेश घायवळ प्रकरण आणि त्याचा भाऊ सचिन घायवळला दिलेल्या शस्त्र परवान्यावरुन अजित पवार म्हणाले, काहींनी शिफारस केली असली, तरी इथल्या पोलीस आयुक्तांनी त्यांना शस्त्र परवाना दिलेला नाही, असं मला पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. पुण्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही कायदा-सुव्यवस्था ठेवणे हे सरकारच काम आहे. यात पोलीसांची महत्वाची जबाबदारी आहे. मी कोणाकडून राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही. मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र होतो, त्यावेळी हा विषय निघालेला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हीच भूमिका मांडली. अजिबात कोणाची फिकिर करायची नाही. ज्यांनी कुठे चूका केलेल्या असतील, त्यांच्यावर रीतसर कारवाई करायची, चौकशी करुन जे दोषी असतील, त्यांच्यावर पुढची कारवाई होणार असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
लाडकी बहिण योजनेवर पवार म्हणाले, खर्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केवायसी करावीच लागेल.
फोटो काढतात म्हणजे संबंध असतो असे नाही
आता मी इथे कार्यक्रमाला आलोय. अनेक लोक येतात बरोबर, फोटो काढतात. आपल्याला माहित नसते कोण कसे काम करतय. अलीकडे मोबाइल आलेले आहेत. मोबाइलने व्हिडिओ काढले जातात, सेल्फी काढल्या जातात. हे सर्व करताना संबंध असतो असे नाही. पण चौकशी करताना फोन संभाषणाचे पुरावे अशा या सगळ्या गोष्टी आढळल्या, तर कारवाई केली पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले.
मला कळल्यावर मी संध्याकाळी काढून टाकले
दहा-बारा वर्ष झाली असतील, आझम पानसरे तेव्हा पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष होते. चुकीच्या व्यक्तीला प्रवेश दिलेला. मला कळल्यावर मी संध्याकाळी काढून टाकले. मी जाहीर भाषणात सांगतो, तुमच्यावर अन्याय झाला तर तुमच्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन. पण तुमचे हात कुठे खराब असतील, तर तुम्हाला पाठीशी घालणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दबाव शिफारस सर्व गोष्टींची चौकशी होणार
मंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिला या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, शस्त्र परवाना दिला नाही, असे पोलीस आयुक्तांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सर्व चौकशी करायला सांगितली आहे. कोणी पासपोर्ट दिला? कोणाचा दबाव होता, काय याची चौकशी होईल. कोणी शिफारस केली असली, तरी शहानिशा करणे पोलिसांचे काम आहे. मी ३५ वर्ष राजकीय जीवनात काम करतोय. एखाद्या गोष्टीला रिमार्क मारला, तर त्यावेळेस अधिकार्यांनी काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या असतात, असेही पवार यांनी नमूद केले. रिमार्क मारून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतरही ते काम केल्यास संबंधित व्यक्ती शंभर टक्के दोषी आहे, असेही त्यांनी सांगितले.
विमानताळाच्या नावाचा निर्णय जनतेच्या बहुमताचा विचार करुन
नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव देणार? यावर अजित पवार म्हणाले, तिथे विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग सुरु व्हायला अजून ४५ दिवस लागणार आहेत. मान्यवरांनी तारीख दिली, उदघाटन झालं की, पुढची काम गतीने होतात. मुंबई विमानतळावर लोड भरपूर आहे, त्यासाठी या विमानतळाची आवश्यकता होती. आता उद्घाटन केलेल्या विमानतळाची क्षमता नऊ कोटी आहे. राहिलेली कामे चांगल्या पद्धतीने करण्याची आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात तिथल्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या लक्षात घेऊन सरकारकडून योग्य ती कारवाई करु. नाव देण्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी चर्चा केलेली आहे. अशा जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी येते त्यावेळी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जातो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.