
दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगाराच्या पगारात होणार भरीव वाढ
पुणे: महापालिकेच्या तब्बल ९ हजार कंत्राटी कामगारांना बोनस, रजा वेतन आणि घरभाडे मिळणार आहे. दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगाराच्या पगारात भरीव वाढ होणार आहे. १ ऑक्टोबरपासून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी हा निर्णय घेतला.
महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये कंत्राटी कामगार काम करत आहेत. यामध्ये आरोग्य, घनकचरा, सुरक्षा विभागात सर्वाधिक कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून कंत्राटी कामगारांकडून बोनसची मागणी होत आहे. त्यामुळे यावेळी महापालिका आयुक्त यांच्या पुढाकारामुळे कंत्राटी कामगारांची रजा वेतन घरभाडे मिळणार आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेत कंत्राटी पध्दतीने कामाला असणार्या कुशल कामगारांना रजा वेतन आणि घरभाडे मिळणार आहे. ज्यांचा पगार २१ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यांना बोनस मिळणार नाही. कुशल कामगारांच्या पगारामध्ये महिन्याला २ हजार ३१० रुपये इतकी वाढ होणार आहे. अकुशल कामगारांच्या पगारामध्ये ३ हजार ७७५ रुपये वाढ होईल . यामध्ये बोनस, घरभाडे आणि रजा वेतन यांचा समावेश असणार आहे.