
संग्रहित फोटो
पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे आवाह
PUNE: पुण्यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य निवडणूकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल आहेत. त्यानुसार प्रशासनाने काम सुरु केले आहे. पुणे महापालिकेची प्रभाग रचना तयार आहे, तसेच काही नगर सेवकांची संख्या कमी होणार असल्याचा अंदाज लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम निर्णाम होत आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेसंदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांबाबत प्रभाग रचनेसंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत. या आदेशात नमूद असलेल्या वेळापत्रकानुसार सद्यस्थितीत शहर जनगणना कार्यालयाकडून प्राप्त झालेली लोकसंख्या, प्रगणक गट आदी जनगणनेची माहिती तपासणे, स्थळ पाहणी करणे आदी कामकाज प्राथमिक स्तरावर सुरु करण्यात आलेले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करणे व त्यावर हरकती सूचना मागविणे व आलेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेण्यात येणार असून त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती महापालिका संकेतस्थळावर व विविध प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी प्रभाग रचनेसंदर्भातील कामकाज हे गोपनीय स्वरूपाचे असून ते प्राथमिक स्तरावर सुरु असून अद्याप प्रभाग रचनेचे काम गोपनिय असते. अद्याप मतदार सूचीनुसार मॅपिंगचे काम सुरू देखिल झाले नसताना काही राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींकडून प्रभाग रचनेसंबधी दिशाभूल करणार्या व अफवा पसरवणार्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केले आहे.
या प्रकाच्या वृत्तांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रभाग रचनेबाबतच्या दिशाभूल करणाऱ्या व अफवा पसरवणाऱ्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नये. महापालिका निवडणूक विषयक अद्ययावत माहितीसाठी पुणे महापालिकेच्या अधिकृत www.pmc.gov.in या संकेतस्थळावर संपर्क करावा. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, नगरविकास विभागाने महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १० जून रोजी महापालिकांना प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. यानंतर दोनच दिवसांनी प्रभाग रचनेचा कार्यक्रमही जाहीर केला असून २३ जून रोजी या आदेशात सुधारणा करत प्रभाग रचना अंतिम करण्याचा कालावधी देखील वाढविला आहे. नगरविकास विभागाने दिलेल्या कार्यक्रमानुसार प्रारुप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे त्यावर हरकती सूचना मागविले, त्यावर सुनावणी घेणे आणि त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर आणि माध्यमांमध्ये देखिल प्रसिद्ध केली जाणार आहे. परंतू शासनाच्या वेळापत्रकानुसार प्रभाग रचनेचे काम प्राथमिक स्तरावर गोपनियरित्या सुरू आहे. प्रभाग रचनेचे मतदार याद्यांनुसार अद्याप मॅपिंग देखिल झालेले नाही. असे असताना काही राजकिय पक्षाचे प्रतिनिधी प्रभाग रचना झाल्या संदर्भात दिशाभुल करून अफवा पसरवत आहेत. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे दिवटे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
—-