
गुंडांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न, कदम कुटुंब भयभीत
PUNE : जगाच्या नकाशात खराडी गावाचे नाव दर्शविले जाते. याचे कारण म्हणजे या भागात निर्माण झालेले आयटी पार्कचे मोठे झाळे. आयटी पार्कमध्ये जगभरातील मोठं-मोठ्या कंपन्या या भागात काम करतात. त्यामुळेच खराडीतील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्यापेक्षा जमिनीचे भाव वाढल्याने दलालांपासून बिल्डरांपर्यंत मोक्याच्या जमिनीवर डोळा ठेवला जात आहे. असाच डोळा खराडी बाय रस्त्यावरील खराडीतील थिटे वस्तीतील मोक्याच्या जागेवर एका बिल्डरने ठेवला आहे. शुक्रवारी (दि.५) जागेत येऊन बेकायदेशीरपणे बळजबरी व दंडलशाहीकरून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खराडीमधील सर्वे नंबर २२/१/१ मधील साडेसात गुंठे मुळ जागा मालक कल्पना सुनील कदम (रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) यांनी खराडी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे, त्यानुसार खराडीतील बिल्डर राजेश बन्सल यांना समज देण्यात आली आहे.
तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, कुंपण तोडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडांनी जेसीबी लावून ताबा घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना विरोध केला. त्यावेळी आम्ही जमीनीचे मुळ मालक असूनही त्यांनी आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली. आम्ही इथले भाई आहोत, आमचे कोणी वाकडे करू शकणार नाही, असे सांगून जबरदस्तीने काम सुरूच ठेवले, गुंडावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत असल्याने कदम यांनी खराडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
या गावगुंडांवर गुन्हा दाखल करावा व न्याय मिळवून द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. खराडीतील सर्व्हे नंबर २२/१/१ येथे कल्पना सुनील कदम या नावाने वडीलोपार्जित साडेसात गुंठे जमीन असून, या जमिनीवर त्यांचा कायदेशीर ताबा असताना राजेश बन्सल व त्यांच्यासोबत आलेल्या पाच ते सहा गुंडांनी जेसीबी लावून कुंपण व कुलूप तोडले. येथील पत्रे तोडले तसेच जबरदस्तीने जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना हटकले व ही जागा आमच्या मालकीची आहे, तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून आमच्या जागेत अतिक्रमण करत आहात अशी विचारणा केल्यावर “आम्ही इथले भाई आहोत आमच्या वाटेला याल तर तुम्हाला महागात पडेल अशी धमकी दिली. या गावंगुंडांपासून आमच्या जीवाला धोका असून याबाबत पोलिसांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे रेकॉर्ड तपासावे तसेच त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, असे तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच आम्हाला न्याय मिळविण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा इशाराही कदम यांनी पोलिसांना दिला. व्यावसायिक गुन्हेगारांना व रेकॉर्डवरील गुंडांना हाताशी धरून आमची जमिन बळकवण्याचे काम करत आहे, या प्रकारामुळे आमचे कुटुंब भयभीत झाले असून बिल्डर राजेश बन्सल यांच्यासह त्यांच्या गुंडांनी धमकी दिल्याने आमच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात तातडीने लक्ष घालून आमच्या जमिनीवर होणारे बेकायदेशीर अतिक्रमण थांबवावे तसेच अतिक्रमण करणारे व आम्हाला जीवे मारण्याचे धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी, व आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती कदम यांनी खराडी पोलिसांकडे केली आहे.
कदम यांनी दिलेल्या तक्रारी अर्जाची दखल घेत पोलिसांनी बिल्डर बन्सल यांना समज दिली आहे.
या जागेशेजारील दोन गुंठे जागा लाटण्याचा डाव
कदम यांच्याच मालकीची असलेल्या दोन गुंठे जागेवर गेल्या १५ वर्षांपासून न्यायालयात वाद सुरु आहे. हा वाद कदम यांनी न्यायालयाच्या बाहेर मिटवला आहे. तसेच याप्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. जमीनीचे दर बघून दोन दलालांनी ही जागा लाटण्याचा डाव आखला आहे. या प्रकरणी दोन गुंठे जागा मालकांनी खराडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. अर्जाची दखल घेत पोलिसांनी दोन दलालांना जागेवर जाऊ नये, असे आदेश दिले आहेत. मात्र त्यांनतरही ते दोघे म्हसोबा मंदीरात दर्शनाला जाण्याच्या नावाखाली घिरट्या घालत आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील पोलिसांनी आवर घालावा, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.
दरम्यान, खराडीतील जमिनीचे दर कोट्यवधी रुपयांवर गेल्याने दलाल आणि बिल्डरांकडून जागा हडपण्याचा डाव आखला जात आहे.