
संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप: मंत्री चंद्रकांत पाटलांचे आश्वास
अभाविपचा यशस्वी पाठपुरावा; संशोधक विद्यार्थ्यांचे उपोषण समाप्त.
पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थांमार्फत पीएच.डी. (PhD) करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून फेलोशिप अनियमित मिळत असल्याने त्यांनी सुरू केलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थी समन्वय कृती समितीने हा निर्णय घेतला.
संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये थकीत फेलोशिप तात्काळ देणे, फेलोशिपची सुरुवात विद्यार्थ्याच्या नोंदणीच्या तारखेपासून करणे, फेलोशिप वितरणासाठी एकसमान धोरण आखणे, आणि प्रक्रियेतील गुंतागुंत कमी करणे यांचा समावेश होता. यासंदर्भात, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, सर्व संस्थांच्या फेलोशिपसंदर्भात जुलै २०२३ मध्ये आलेला जीआर (GR) आगामी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल आणि त्यानंतर फेलोशिपसंदर्भात शासनादेश लागू करण्यात येईल. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनीही दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.
या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आता प्राप्त झाला असून, मंत्रालय स्तरावर त्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही ना. पाटील यांनी स्पष्ट केले. विशेषतः, कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनासंदर्भात मुख्य सचिवांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. आंदोलनादरम्यान, अभाविपचे पुणे महानगरमंत्री राधेय बाहेगव्हाणकर, सहमंत्री अलोक पवार, आणि सई थोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा सकारात्मक संवाद आणि आश्वासनानंतर संशोधक विद्यार्थी दयानंद पवार यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.