पुणे : शाळेची घंटा, वर्गातील बाक, मधल्या सुट्टीतील गप्पा आणि मित्रांसोबतचे निरागस दिवस… काळ पुढे सरकला, आयुष्याची दिशा बदलली; पण शालेय आठवणी मात्र तशाच जिवंत राहिल्या. खराडीतील सुंदराबाई मराठे विद्यालयाच्या २००५ च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनी एकत्र येत त्या आठवणी पुन्हा अनुभवण्याचा भावनिक क्षण नुकताच अनुभवला.
आयोजित करण्यात आलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले विद्यार्थी एकत्र आले होते. कोणी वकील, अभियंता, उद्योजक तर कोणी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विविध ठिकाणी स्थायिक झालेले; मात्र शाळेच्या आठवणींनी आणि एकमेकांना भेटण्याची लागलेली ओढ. प्रत्येकजण पुन्हा एकदा शाळकरी मुलगा बनल्याचे चित्र पाहायला मिळाले. शाळेचे शिक्षक प्रदीप जगताप, राजेश दरेकर, गुजर सर आदी उपस्थित होते.
शालेय जीवनात सोबत घालवलेले क्षण, मनात साठलेल्या आठवणींचा बांध आज अखेर फुटला. एक बाकांवर बसून केलेल्या गमती जमती, शिक्षकांच्या हातून खाल्लेला मार, एकमेकांना टोपणनावाने मारलेली हाक तसेच खोडकर किस्से यामध्ये सर्वजण रमून गेले होते. अनेकांनी जुन्या मित्रांना पाहताच भावनांना वाट मोकळी करून दिली. काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “इतक्या वर्षांनी पुन्हा सगळे भेटलो, हेच खूप मोठं समाधान आहे,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
या वेळी शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात शाळा आणि शिक्षकांचे योगदान कसे महत्त्वाचे ठरले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील शिस्तीमुळे घडलो, अशी भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात प्रत्यक्ष भेटीतून जपले गेलेले हे नाते अनेकांसाठी अविस्मरणीय ठरले. “मैत्रीचा तो काळ पुन्हा जगता आला,” अशी भावना व्यक्त करत पुढील काळातही असे मेळावे नियमित आयोजित करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी केला.
सुरज पडवळे, गणेश ढेरेंगे, वैभव खेडकर, भाग्यश्री शिंदे, वृषाली उत्तेकर, मंगेश कावळे, देवेंद्र पटेल, मनोज यादव, योगेश दुधनकर, सोमनाथ तिडके, शैलेश घुले, विशाल बोराटे, सदानंद कदम आदी विद्यार्थ्यांनी नियोजन केले.
दरम्यान, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातून मेळाव्यासाठी काही विद्यार्थ्यांनी आल्या होत्या. माहेरी येण्याची ओढ जशी लागते, तशी मेळाव्याची ओढ लागली होती. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुरज पडवळे यांनी प्रास्ताविक केले तर वैभव खेडकर यांनी आभार मानले.
…..
मुले भेटू शकतात, पण मुलींच्या भेट होणे कठीण असते
आजूबाजूच्या परिसरातील बहुतांश विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे मुलाची मैत्री ही दीर्घ काळ टिकून राहते. मात्र शाळेतील मुलींचे एकदा का शिक्षण त्यानंतर लग्न झाले की त्या आपला परिसर किंवा गाव सोडून सासरी जातात. माहेरची आठवण त्यांना कायम असतेच. पण शाळेतील मित्र मैत्रिणींना भेटणे सहज शक्य नसते. त्यामुळे त्यांच्या आठवणी या कायम त्यांच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात. माजी विद्यार्थी मेळ्याव्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्यांचे मन मोकळे होते. शाळेच्या मित्रांना भेटणे हा आयुष्यातील खूप वेगळा अनुभव असतो. तो आज आपण सर्वांनी अनुभवला, तो ठेवा जतन करून ठेवा आणि आयुष्य आनंदाने आणि एकोप्याने जगा असा संदेश जगताप सरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.