
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेस अंतिम मान्यता
प्रभाग रचनेतील बदलाची माहिती सोमवारी होणार स्पष्ट
पुणे : पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अंतिम प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. प्राधिकृत अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार ही मान्यता मिळालेली आहे. अशी माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली.
दरम्यान, अंतिम प्रभाग रचनेचे गॅझेट पब्लिकेशन सोमवारपर्यंत प्रसिद्ध होणार आहे.
यंदा महापालिका निवडणूक चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनुसार होणार असून एकूण १६५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या. तब्बल ६ हजार हरकती प्राप्त झाल्या. यातील ८२८ नागरिकांनी सुनावणीस हजेरी लावली होती. सुनावणीदरम्यान नैसर्गिक हद्दी न पाळल्याचे, प्रभागांची मनमानी मोडतोड केल्याचे आरोप करण्यात आले. तसेच या बदलांचा आगामी आरक्षण प्रक्रियेवरही परिणाम होणार असल्याचे सूचित केले होते. हरकतींची सुनावणी झाल्यानंतर आवश्यक ते बदल करून अंतिम रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली होती. त्यास आयोगाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता यापुढील निवडणूक प्रक्रियेला वेग येणार आहे.
दरम्यान, प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकती व सुनावणीनंतर शासनाने त्यात सुमारे १४ ते १५ बदल केल्याची चर्चा आहे. यामध्ये ६ ते ७ प्रभागांच्या नावांमध्ये सुधारणा, तर ८ ते १० प्रभागांच्या हद्दींमध्ये बदल केले असून उपनगरांतील काही प्रभागांच्या हद्दींमध्येच मुख्य बदल केल्याचे बोलले जात आहे. मात्र, गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागांचे अधिकृत स्वरूप स्पष्ट होईल व त्यानुसार महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची पुढील कार्यवाही सुरु होणार आहे.