
पुणे : पुण्यातील राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी राष्ट्रसेवा दलाच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा कांदळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी सेवा दलाचे राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांदळकर हे मूळचे संगमनेर तालुक्यातील तिगाव येथील रहिवासी असून ते मुक्त पत्रकार, लेखक, विचारवंत, राजकीय विश्लेषक आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी राजा कांदळकर (संगमनेर), संजय गायकवाड (पुणे), रोहित शिंदे (सांगली) या तिघांचे अर्ज आले होते. मात्र, गायकवाड आणि शिंदे यांनी त्यांचे अर्ज मागे घेत कांदळकर यांना पाठिंबा दर्शविला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या अॅड. जाकीर अत्तार यांनी कांदळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी सेवा दलाचे माजी कार्यकारी विश्वस्त, आमदार कपिल पाटील, राष्ट्रसेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, राष्ट्रीय महासचिव आबिद खान, विश्वस्त अतुल दि. देशमुख,जयवंत पाटील, छात्रभारतीचे प्रदेशाध्यक्ष रोहित ढाले, कार्याध्यक्ष अनिकेत घुले आदी उपस्थित होते. कांदळकर यांच्या निवडीचे अनेकांनी कौतुक केले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे चरित्र ‘यस वी कॅन’, ‘१०१ प्रभावशाली महाराष्ट्रीयन’, साथी भास्करराव दुर्वे नाना यांचे चरित्र ‘नायक’, ‘गुजरात विधानसभा निवडणूक’ आदी पुस्तकांचे कांदळकर यांनी लेखन, संपादन केले आहे.