पुणे: पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोयत्याची दहशत दाखवून धाक दाखवणे, कोयत्याच्या सहाय्याने हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. गाडी लावताना तू माझ्याकडे का बघतोस असे म्हणत दोघांवर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात एका तरुणाच्या मनगटावर वार करून त्याच्या पंजा हातापासून वेगळा केल्याचा धक्कादायक घटना घडली. ही घटना बिबवेवाडी भागातील अप्पर इंदिरानगर येथे सोमवारी दुपारी साडेचार दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गौरव राजेश मरकड (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) आणि त्याचा मित्र पियुष पाचकुडवे (वय २२, रा. सुपर इंदिरानगर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीवरून अल्पवयीन मुलासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मिथिलेश सरोज (वय २१, रा. वडकीनाला, पुणे) असे अटक झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी व फिर्यादी यांची बघ्याण्यावरुन वाद झाले होते. त्यानंतर सोमवारी आरोपीने त्या दोघांना पूर्वी झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी भेटायला बोलावले होते. समोर आल्यावर लगेचच त्याने फिर्यादीवर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. यामध्ये पहिलाच वार फिर्यादीच्या हातावर केला यात त्याच्या हाताचा पंजा खाली पडला. तसेच त्याच्या डोक्यात देखील गंभीर वार करण्यात आले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी जखमींना तात्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात आले. यांच्यावर शस्त्रक्रिया सुरु असून हात जोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.
फिर्यादी गौरव मरकड आणि आरोपी सागर यांच्यात वाद आहेत. एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून त्यांच्यात भांडणं झाली होती. आपसातील वाद मिटवण्याचा बहाणा करून आरोपींनी गौरवला आणि त्याच्या मित्राला सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अप्पर इंदिरानगर येथील शिवतेज क्रीडा संघ चौकात बोलावले होते. गौरव आणि पियुष तिथे पोहोचले. तेथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. आरोपी सागर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने पियूषवर कोयत्याने वार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी तिथून पसार झाले.
या हल्ल्यात पियूषच्या हाताचा पंजा तुटून वेगळा झाला. त्यावेळी गौरव हा पियूषला वाचविण्यासाठी गेला. परंतु आरोपींनी त्याच्याही डोक्यावर आणि खांद्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सागरला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.